अभिमन्यू
नात्यांचा गच्च मिठीत, मी थंड राहिलो
आयुष्याचा या प्रणयात, मी षंड राहिलो
वादळात ज्या तरू चा, घेतला मी आसरा
त्याचाच लाकडांच्या चितेवर, दैवाने निजविले मला
नात्यांच्या या मोहजाली, अभिमन्यू मी जाहलो
चिंब पावसाच्या सरीत, कोरडा मी राहिलो
आबा
खुर्ची ला वाळवी लागली होती
चार पैकी एका पायाने, साथ सोडली होती
वाळक्या शुष्क कातडीने झाकलेली, अडगळ त्यात बसली होती
त्या कोरड्या डोळ्यात पण आसवांचा पूर होता
आबांच्या दृष्टीस मात्र सर्वत्र धूर होता
स्वतःच्या रक्ताची नाती, त्यांचा अंताची वात पहात होती
आबांना यापुढे फक्त, फाटक्या विजारीची साथ होती
खुर्ची खाली गंजलेल्या ताटात, कोरडा शिळा भात होता
स्वतःच्याच घरी आबांचा, कैद्याचा थाट होता !!
पुतळा
पुनर्जन्म आहे हा माझा?
माझ्या कार्याचा सन्मान?
का मरणोत्तर शिक्षा म्हणून
मला असे चौकात उभे केले आहे?
काळातील कोणास या पुतळ्या चा वेदना?
उन, वारा, थंडी, पाऊस झेलत
सतत एकाच स्थितीत रहाणे
यालाच जन्मठेप म्हणतात?
माझा संपूर्ण कृष्णवर्ण काय
माझ्या आयुष्यातील कथित कलंक झाकण्यासाठी आहे?
हे मनातील वादळ दर्शवण्यासाठी सुद्धा
मला अधिकार नाही काय?
निदान अश्रु ढाळण्याची मुभा तरी?
किती दिवस राहू मी
माणसांच्या गर्दीत असा एकटा? अनुत्तरीत ?
जगू दे इतिहासात मला माणूस म्हणून
पुतळा म्हणून नव्हे !!
leave a comment